सध्या सगळीकडेच परीक्षांचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेची जोरदार तयारी करत आहेत. पण परीक्षा देताना पेपर पूर्ण कसा करायचा, सगळे प्रश्न सोडवले जातील का याची चिंता विद्यार्थ्यांना असते. पण ते सहज शक्य आहे, त्यासाठीच पेपर कसा सोडवावा याच्या काही खास टिप्स पाहूया.
सगळ्यात पहिल म्हणजे,
वेळेच्या आधी पोहोचा: परीक्षा देताना सर्वात महत्वाची असते ती वेळ. त्यामुळे परीक्षेच्या एक तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणे गरजेचे आहे. तिथली seating arrangements, तिथले वातावरण याच्याशी आपण जुळवून घेतले तर त्या ठिकाणी पेपर देताना आपल्याला सहजपणा जाणवतो, त्या जागेचे दडपण निघून जाते. परीक्षेच्या आधी काही सूचना दिल्या तर त्याही आपल्याला समजतात. विशेष म्हणजे उशिरा पोहोचलो तर पेपर सोडवताना गोंधळ उडून अनेक चुका होऊ शकतात.
स्वतःला शांत ठेवा: बर्याचदा अभ्यास झालेला असतो पण आपला परीक्षेचे दडपण आल्याने मनातून गोंधळ उडालेला असतो. काय लिहायचे, काय नाही याची चिंता असते. त्यामुळे अभ्यास असतानाही ऐनवेळी परीक्षा केंद्रावर घाईगडबड होते आणि त्याच गडबडीत आपण अनेक चुका करतो. त्यामुळे परीक्षा देताना स्वतःला शांत ठेवणे गरजेचे आहे. आपला किती आभ्यास झाला आहे, आपल्याला काय लिहायचे आहे याचे नियोजन करून परीक्षेआधी शांत राहणे आवश्यक आहे.
पेपर सोडवण्या आधी: परीक्षा केंद्रावर सर्वप्रथम उत्तरपत्रिका दिली जाते. त्यामुळे उत्तरपत्रिका हातात येताच आपला हजेरी क्रमांक, परीक्षा क्रमांक, विषयाचा कोड आणि इतर सगळे तपशील काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे. उत्तर पत्रिकेचे तपशील लिहिताना त्यामध्ये चुका होता कामा नये, जेणेकरून मार्कींग करताना अचूक पद्धतीने केले जाईल. यासोबतच पेपर सुरू होईपर्यंत मार्जिन आखून घ्या, ज्यामुळे आपली answer sheet छान दिसते.
प्रश्नपत्रिका हातात आल्यावर: सर्वात आधी पूर्ण प्रश्नपत्रिका वाचावी. जे प्रश्न येत आहेत, जे सोपे प्रश्न आहेत ते आधी सोडवून घ्यावेत. कारण जे प्रश्न येत नाहीत त्याचा विचार करण्यात अधिक वेळ निघून जातो. एकदा जे प्रश्न येत आहेत ते सोडवून घेतले की राहिलेला वेळ नंतर अवघड प्रश्नांना देता येतो.
पेपर लिहिताना: पेपर सोडवताना question, subquestion यांचे number योग्य लिहिणे गरजेचे आहे. कारण प्रश्नांचा क्रमांक चुकला आणि उत्तर बरोबर असले तरीही गुण दिले जात नाहीत. शिवाय नवीन प्रश्न नव्या पानावर लिहावा. पेपर हा सुटसुटीत आणि मुद्देसूत असावा. मोठे Paragraph लिहिण्यापेक्षा precise लिहिला तर शिक्षकांना पेपर तपासणे अधिक सोपे होते.
टापटीपपणा हवा: आपल पेपर टापटीप असेल तर पेपर तपासणारे शिक्षकही मार्क्स देताना त्याचा विचार करतात. त्यामुळे पेपरमध्ये जास्त चुका, खाडाखोड, शाईपेनाचे डाग, जिथे चुकले असेल तिथे गिरवलेले मोठे गोळे हे असले प्रकारा टाळावेत. पेपर अस्वच्छ असेल तर उत्तर बरोबर असूनही गुण कमी होण्याची शक्यता असते.
अधिकचे लिहिणे टाळा: अनेकदा असेही होते की, जो प्रश्न येत असतो त्याचेच उत्तर आपण खूप लिहीत जातो. पण अशाने वेळ आणि मेहनत दोन्हीही वाया जाते. जे आवश्यक आहे, अपेक्षित ते आणि तेवढेच पेपरमध्ये लिहावे. उत्तर लिहिताना त्या प्रश्नाला असलेले गुण लक्षात घेणेही गरजेचे आहे.
अवघड प्रश्न सोडवताना: अवघड प्रश्न सोडवताना त्यावर फार वेळ विचार करण्यापेक्षा त्यातले जे येत आहे, ते लिहून काढा. तो प्रश्न न सोडवून मार्कसचे नुकसान करण्यापेक्षा तो लिहून पूर्ण करा. जेणेकरून पेपर अपूर्ण राहणार नाही, सर्व प्रश्न सोडवले जातील आणि योग्य वेळेत पेपर पूर्ण होईल.